अधिकारी घडविण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा अभिमान - नामदार विखे पाटील

संगमनेर Live
0
अधिकारी घडविण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा अभिमान - नामदार विखे पाटील

◻️ प्रवरेचे १५८ विद्यार्थी प्रशासकीय सेवेत; ‘जनता दरबारा’त कौतुकाची थाप

संगमनेर LIVE (​लोणी) | ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न आता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे. प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या प्रभावी कामगिरीमुळे आतापर्यत १५८ विद्यार्थ्याची प्रशासकीय सेवेत निवड झाली असून, सध्या २१३ विद्यार्थी येथे भविष्यातील संधींसाठी प्रशिक्षण घेत आहेत. 

या यशाचा गौरव करताना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. सध्या राहाता तालुक्यातील चार ठिकाणी ही केंद्रे कार्यरत असून, ग्रामीण गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचे काम या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. ​रविवारी (दि. १२) आयोजित ‘जनता दरबार' कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा विशेष सन्मान केला.

यामध्ये सहायक विक्रीकर अधिकारी म्हणून मुंबईत रुजू झालेल्या वृंदा बाळासाहेब निर्मळ, ठाणे पोलीस प्रशासनात निवड झालेले अवधूत भास्कर भुजबळ व तुषार सुनील डांगे, पुणे पोलीस दलात निवड झालेले अक्षय कैलास निर्मळ आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेले किरण भास्कर शेलार यांचा समावेश होता. यासोबतच ज्युनियर असिस्टंट सौरभ घोरपडे, पुणे शहर पोलीस दलातील साहिल जाधव आणि महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झालेले गणेश जगताप व निखिल जगताप या तरुणांचेही त्यांनी कौतुक केले.

​यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अतिशय मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेत मिळवत असलेले यश ही आपल्या भागासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तरुण प्रशासकीय सेवेत दाखल होत असल्याचे पाहून मोठे समाधान वाटते आणि भविष्यातही या केंद्रातून अधिकाधिक अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, सत्कार समारंभानंतर पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्न निर्धारित वेळेत मार्गी लावण्याचे कडक आदेश दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !