आशा भोसले यांच्या निधनाने एका दैवी स्वराचा अंत - नामदार विखे पाटील
◻️ संगीताचा ‘आशा-दीप’ विझल्याच्या शोक भावना केल्या व्यक्त
संगमनेर LIVE (शिर्डी) | भारतीय संगीत क्षेत्राचा आधारस्तंभ आणि आपल्या सुरावटींनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप आणि लावणीपर्यंत सर्वच गायन प्रकारांत त्यांनी उमटवलेला ठसा अजरामर आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
आपल्या शोक संदेशात नामदार विखे पाटील म्हणाले की, स्वरसम्राज्ञी आशा भोसले आता आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा जणू ‘आशा-दीप’च विझला आहे, अशी भावना आज प्रत्येक संगीतप्रेमीची झाली आहे. सहा दशकांहून अधिक काळ संगीत सेवेसाठी समर्पित झालेल्या त्यांच्या जादूई आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले होते.
आशाताईच्या अष्टपैलू गायकीचा गौरव करताना विखे पाटील यांनी त्यांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, आशा भोसले यांनी मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांतील गाण्यांमधून भारताच्या एकसंघ भावनेचा आवाज मांडत विविधतेतून एकतेचे दर्शन घडवले. त्यांच्या आवाजात कमालीची लवचिकता होती आणि कोणत्याही शब्दाला केवळ सुरांनी जिवंत करण्याची अफाट ताकद त्यांच्याकडे होती. जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
“आशा भोसले हे केवळ एक नाव नसून संगीतातील चैतन्य होते. आजही त्यांचे गाणे ऐकल्याशिवाय मराठी आणि हिंदी रसिकांचा दिवस पूर्ण होत नाही. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक विश्व समृध्द करणारा एक स्वर कायमचा शांत झाला आहे,” असेही विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.