शिबलापूरमध्ये महात्मा फुले आणि महामानवाच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन
◻️ शिबलापूरमध्ये आरोग्य शिबीर, बैलगाडा शर्यती, मर्दानी खेळ अन् प्रबोधनाचा जागर!
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील संविधान चौकात ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मर्दानी खेळ, बैलगाडा शर्यती, आरोग्य शिबीर आणि प्रबोधनपर कीर्तन अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी (दि. १३) दुपारी भव्य ‘बैलगाडा शर्यती’ पार पडणार असून या शर्यतीतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे प्रबोधनपर कीर्तन होईल, ज्यातून महामानवांच्या विचार जनमानसापर्यत पोहचवले जातील. कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
महोत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी (दि. १४) सकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल आणि त्यानंतर नियोजित स्मारकाच्या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होईल. या दिवशी सनई आणि हलगीच्या पारंपारिक निनादात भव्य मिरवणूक काढली जाणार असून, यामध्ये ‘जाणता राजा प्रतिष्ठान’तर्फे मर्दानी खेळ आणि ‘फिनिक्स अकॅडमी’तर्फे मल्लखांबची थरारक प्रात्यक्षिके सादर केली जातील. तसेच सटाणा येथील सुप्रसिध्द ‘बागायतदार ब्रास बॅड'चे सादरीकरण आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक नृत्य स्पर्धा २०२६’ चा विशेष कलाविष्कार नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.
उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत या महोत्सवात ‘रक्तदान शिबिर’ आणि ‘सर्वरोग निदान शिबिर’ यांसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘पुस्तक वाटप’ उपक्रम राबवून ज्ञानाचा जागर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ‘संघर्ष क्रिकेट क्लब’ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या आहेत.
दरम्यान, या दोन दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवासाठी शिबलापूरसह परिसरातील सर्व भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.