कॉग्रेसची मुत्सद्देगिरी; २०२९ च्या विजयाचा निर्धार करत बारामतीतून उमेदवारी मागे

संगमनेर Live
0
कॉग्रेसची मुत्सद्देगिरी; २०२९ च्या विजयाचा निर्धार करत बारामतीतून उमेदवारी मागे

◻️ ​उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या विनंतीला मान

संगमनेर LIVE (​मुंबई) | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काॅग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून “आज आम्ही दोन पावले मागे आलो असलो तरी, २०२९ मध्ये बारामतीचा आमदार काॅग्रेसचाच असेल,” असा ठाम विश्‍वास काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

​गांधी भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ राजकीय नसून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि समन्वयाला जपण्यासाठी घेतला आहे. दिवंगत अजित पवार यांचे काॅग्रेस पक्षाशी अनेक वर्षाचे ऋणानुबंध होते आणि हीच बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काॅग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. यासोबतच छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांनीही काॅग्रेसला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. 

तसेच राष्ट्रवादीच्या विविध आमदारांच्या एका शिष्टमंडळाने प्रत्यक्ष गांधी भवनला भेट देऊन ही विनंती लावून धरली होती, त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.​उमेदवारी मागे घेतली असली तरी काँग्रेसने आपल्या मूळ वैचारिक भूमिकांशी कोणतीही तडजोड केलेली नाही. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले की, अजित पवार यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी या मागणीवर काॅग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे. तसेच भाजपसारख्या विखारी पक्षासोबत राष्ट्रवादीने केलेली युती आम्हाला कदापि मान्य नाही आणि आमचा भाजपला असलेला विरोध भविष्यातही कायम राहील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या संदर्भात फोन आला होता, मात्र त्यांच्या विनंतीचा आणि या निर्णयाचा कोणताही संबंध नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
​याच दरम्यान काॅग्रेसशासित कर्नाटक सरकारने या प्रकरणाची दखल घेत एफआयआर नोंदवल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी काॅग्रेसचे आभार मानले आहेत. 

पार्थ पवार यांनी काॅग्रेसबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करताना रोहित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवारांचे विधान अत्यंत अपरिपक्व आणि अनावश्यक असून त्याचे कोणीही समर्थन केलेले नाही, असे मत प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले.

​हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीतील काॅग्रेस उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे आणि इतर स्थानिक कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे सविस्तर संवाद साधला. कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पक्षश्रेष्ठींच्या संमतीने ही अधिकृत घोषणा करण्यात आली. 

दरम्यान आम्ही विचाराने लढणारे लोक आहोत आणि बारामतीत काॅग्रेसची ताकद पुन्हा उभी करण्यासाठी आम्ही सज्ज असून २०२९ ची निवडणूक ही काॅग्रेसच्या पुनरागमनाची नांदी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !