श्री तुळजाभवानी देवींला अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने केले अर्पण
◻️ मुकुट आणि पारंपरिक ‘कानातील मासे' देवीच्या चरणी सुपूर्द
संगमनेर LIVE (तुळजापूर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या दानांची परंपरा आजही तितकीच श्रध्देने जपली जात आहे. याच श्रध्देतून पुण्यातील पिंपळे गुरव येथील भाविक दिगंबर बसवंतराव बिरादार यांनी आज श्री तुळजाभवानी देवीला सुमारे अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने अर्पण केले.
दिगंबर बिरादार हे आज गुरुवारी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनानंतर त्यांनी आपली श्रध्दा व्यक्त करत देवीसाठी खास तयार करण्यात आलेला चांदीचा मुकुट आणि पारंपरिक कानातील मासे मंदिर संस्थानकडे सुपूर्द केले. या दागिन्यांचे एकूण वजन ५०० ग्रॅम (अर्धा किलो) इतके आहे.
देवीला दागिने अर्पण केल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दिगंबर बिरादार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरातील मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी विकास वाणी, महेश गंजे, सूरज घुले तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी आणि इतर भाविक उपस्थित होते.