श्री साईबाबा संस्थानतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

संगमनेर Live
0
श्री साईबाबा संस्थानतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

◻️ ​५४ आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव; विद्यार्थ्यासाठी नीट-जेईई मार्गदर्शन वर्गाची घोषणा

संगमनेर LIVE (​शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थानच्या विविध विभागांतील ५४ आदर्श कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. संस्थानच्या निरंतर प्रगतीमध्ये आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून वाढत्या भाविक संख्येनुसार संस्थानच्या सेवा कार्याचा विस्तार होत आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करताना गाडीलकर यांनी या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट आणि जेईई मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ‘ईएसआयसी’ रुग्णालय सेवेचा प्रस्ताव देखील प्रगतीपथावर आहे. अशी माहिती दिली.

सोहळ्यामध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ५४ कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र, शाल आणि श्री साई दिनदर्शिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यासोबतच क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवणारा आंतरराष्ट्रीय केटलबेल स्पर्धेसाठी निवड झालेला श्लोक सचिन गिते आणि राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झालेला वंश रुपेश जाट या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, या सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, अतुल वाघ, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसंत वाणी व राजेंद्र कोहकडे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !