माझा महाराष्ट्र देशाला दिशादर्शक - डॉ. जयश्री थोरात
◻️ अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि क्रांतिकारकांची भूमी असून आपला महाराष्ट्र आज विविध क्षेत्रांत देशाला दिशा देण्याचे काम करत आहे, असे गौरवौद्गार संगमनेर तालुका काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी काढले.
महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर येथील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. माजी मंत्री तथा काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्री थोरात यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि वारशाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीपर्यत या राज्याने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. वारकरी संप्रदायाचा समतेचा आणि मानवतेचा विचार महाराष्ट्राने जगाला दिला असून, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे. पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या या भूमीत सध्या जातीभेदाचे होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यघटना आणि मानवतेचा विचार पुढे नेत शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणातूनच माझा महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समर्थ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनानिमित्त अमृत उद्योग समूहातील विविध विभागांत मान्यवरांच्या हस्ते उत्साहात अभिवादन करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांनी ध्वजारोहण केले, तर राजहंस दूध संघ येथे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी अभिवादन केले.
याचबरोबर अमृतवाहिनी शिक्षण संस्था, एसएमबीटी शिक्षण संस्था, सह्याद्री शिक्षण संस्था आणि अमृतवाहिनी बँक यांसह समूहातील विविध संस्थांमध्ये हा उत्सव साजरा झाला. या सोहळ्याला सहकारी संस्थांमधील पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.