हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेला महाराष्ट्र प्रगतीपथावर - आमदार खताळ
◻️ संगमनेरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; क्रीडा संकुलात आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण
संगमनेर LIVE | “महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि संघर्षातून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी राज्याला प्रगतीची नवी दिशा दिली असून, आज महाराष्ट्र देशपातळीवर सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर येथील क्रीडा संकुलात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी तिरंग्याला वंदन केले.
आपल्या भाषणात आमदार खताळ यांनी महायुती सरकारच्या कामाचा गौरव केला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. राज्याची औद्योगिक आणि आर्थिक वाटचाल वेगाने सुरू असून, त्यामध्ये संगमनेर तालुक्याचा वाटा मोठा असावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
संगमनेर तालुका आगामी काळात आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तालुक्याच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले गेले होते, त्या दिशेने आज वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि नायब तहसीलदार संदीप भांगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.