हवालदार राजू सुद्रिक यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर
◻️ १५ वर्षाच्या उल्लेखनीय सेवेची पावती; पोलीस अधीक्षकाकडून विशेष कौतुक
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह नुकतेच घोषित करण्यात आले. राज्यभरातील ८०० कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या यादीत राजू सुद्रिक यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्थान पटकावले आहे.
हवालदार राजू सुद्रिक हे गेल्या १५ वर्षापासून अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार (ब. नं. ३४५) म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांचा उत्कृष्ट सेवा अभिलेख, प्रशासकीय कामातील गती आणि विभागाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्राद्वारे सुद्रिक यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “तुमच्या उत्तम कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यातही तुम्ही अशाच प्रकारे उल्लेखनीय सेवा बजावत राहाल, असा विश्वास वाटतो.” असे नमूद केले आहे.
दरम्यान, या पुरस्काराची घोषणा होताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून राजू सुद्रिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.