अभिनेता रितेश-जेनेलियाने घेतले तुळजाभवानीचे दर्शन!
◻️ ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या यशासाठी देशमुख दांपत्याकडून पारंपरिक कुलधर्म-कुलाचार संपन्न
रितेश आणि जेनेलिया यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. महाराष्ट्राची आराध्य देवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची त्यांनी आरती केली. यावेळी त्यांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने कुलधर्म आणि कुलाचार पार पाडले. आईच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी संपूर्ण टीमच्या मेहनतीला यश मिळावे, अशी प्रार्थना केली.
विशेष म्हणजे, आज १ मे ‘महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रदर्शित झाला असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना रितेश देशमुख भावूक झाले होते. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना त्यांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेणे हे आमचे कर्तव्य होते. महाराष्ट्र दिनी चित्रपट प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
दरम्यान, यावेळी मंदिर परिसरात या लाडक्या कलाकार दांपत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलीसांनी चोख बंदोबस्तात ठेवला होता.