कामगार हाच देशाचा खरा कणा - अॅड. शाळीग्राम होडगर
◻️ मांचीहिल संकुलात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा
संगमनेर LIVE | “कामगार हा देशाचा खरा कणा असून, देशाच्या प्रगतीत आणि उभारणीत कामगारांचे योगदान अतुलनीय आहे. प्रत्येक कामगाराने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने देश उभारणीसाठी आपले योगदान दिले पाहिजे,” असे प्रतिपादन अॅड. शाळीग्राम होडगर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुल येथे ६६ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अॅड. शाळीग्राम होडगर बोलत होते.
विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयातील संगणक विभाग प्रमुख बाबासाहेब गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अॅड. शाळीग्राम होडगर कामगारांच्या कष्टाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले की, राष्ट्राच्या विकासाचा मार्ग कामगारांच्या घामातून जातो, त्यामुळे त्यांच्या कामाचा आदर करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांच्या बलिदानाचा आणि कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला.
दरम्यान, मांचीहिल परिसरामध्ये गो-रक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या जैन साध्वी प्रीतिसुधाजी महाराज यांचे निधन झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देण्यात आला.