दुर्गापूरच्या स्वप्नाली अन् स्वप्निलच्या जिद्द आणि कष्टाला यशाची झालर!

संगमनेर Live
0
दुर्गापूरच्या स्वप्नाली अन् स्वप्निलच्या जिद्द आणि कष्टाला यशाची झालर!

◻️ ​शेतकरी कुटुंबातील लेकीची महसूल विभागात झेप, तर सुपुत्राने पटकावली पीएचडी

संगमनेर LIVE (​लोणी) | शिक्षणाला कष्टाची जोड दिल्यास ग्रामीण भागातील युवकही शून्यातून विश्‍व निर्माण करू शकतात, याचाच प्रत्यय राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे आला. अत्यंत साध्या आणि शेतकरी पार्श्‍वभूमी असलेल्या स्वप्नाली पानसरे आणि स्वप्निल गोपाळे यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

​दुर्गापूरच्या स्वप्नाली पानसरे हिने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ‘सहाय्यक महसूल अधिकारी’ पदाला गवसणी घातली आहे. तर दुसरीकडे स्वप्निल गोपाळे यांनी पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन कौशल्य विषयात ‘पी. एचडी’ पदवी संपादन केली आहे. दोघांच्याही या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तरुण पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

​सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना सरपंच नानासाहेब पुलाटे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीमुळेच ग्रामीण भागात ज्ञानाची गंगोत्री पोहोचली. 

आज मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक संकुल अधिक सक्षम झाले असून, विद्यार्थ्याना कौशल्याधारित शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. याच पायाभरणीमुळे आज ग्रामीण भागातील मुले प्रशासकीय सेवेत उच्च पदे भूषवत आहेत.”

या सोहळ्याला प्रवरा फळे-भाजीपाला सोसायटीचे माजी अध्यक्ष सोपानराव पुलाटे, प्रवरा बॅकेचे माजी संचालक छगनराव पुलाटे, सरपंच नानासाहेब पुलाटे, उपसरपंच दादासाहेब मनकर, पोलिस पाटील दिलीप पुलाटे यांच्यासह आशुतोष पुलाटे, डॉ. सोमेश्‍वर मनकर, जयदीप पुलाटे, रामेश्‍वर पानसरे, बबन पुलाटे, विठ्ठल पुलाटे, शांताराम  पुलाटे आणि मच्छिंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांचाही सन्मान करण्यात आला.

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी नमूद केले की, स्वप्नाली आणि स्वप्निल यांनी आपल्या मेहनतीने दुर्गापूरचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल केले आहे. हा सत्कार सोहळा केवळ कौतुकापुरता मर्यादित नसून, गावातील इतर विद्यार्थी आणि युवतींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी बळ देणारा ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !