सात्रळ येथे विजेच्या धक्क्यातून तरुण बालंबाल बचावला!

संगमनेर Live
0
सात्रळ येथे विजेच्या धक्क्यातून तरुण बालंबाल बचावला!

◻️ महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी संतापले 

संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रामपूर शिवारात महावितरणच्या विद्युत वाहिनीला पडलेल्या मोठ्या झोळामुळे एका तरुण विजेच्या धक्क्यातून बालंबाल बचावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सात्रळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सात्रळ येथील रामपूर शिवारातील गट क्रमांक ३०४ मध्ये शेतकरी चंद्रकांत डुक्रे यांची शेती आहे. या शेतातून गेलेली महावितरणची विद्युत वाहिनी अत्यंत खाली आलेली असून जमिनीपासून केवळ १० ते १२ फुटांवर आहे. शनिवारी (दि. २) चंद्रकांत डुक्रे यांचा पुतण्या रणजित डुक्रे हा शेतात फवारणी करून आंब्याच्या झाडाखाली विसाव्यासाठी बसला होता. यावेळी त्याचा हात चुकून आंब्याच्या झाडाला लागला आणि झाडात उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे तो लांब फेकला गेला. या अपघातात त्याच्या डाव्या हाताला मोठा धक्का बसला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, रणजित दूर फेकला गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या गंभीर घटनेनंतर शेतकरी चंद्रकांत डुक्रे यांनी सात्रळ सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “देव बलवत्तर म्हणून माझा पुतण्या वाचला, याला पूर्णपणे सात्रळ सबस्टेशन जबाबदार आहे,” अशा संतप्त भावना चंद्रकांत डुकरे यांनी व्यक्त केल्या.

गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांनी केला आहे. सात्रळ परिसरातील शेती आणि व्यापारी वीज वाहिनी सतत खंडित होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत श्रीरामपूर येथील कार्यालयात लेखी तक्रारी देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

​या भागात बिबट्यांचा वावर, वाढत्या चोऱ्या आणि विजेचा लपंडाव यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. आता विद्युत तारांच्या झोळामुळे जिवावर बेतत असल्याने, जर तातडीने सखोल चौकशी आणि दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हंबीरराव कडू, अनिल डुकरे, प्रवीण डुकरे, विकास डुकरे, अमोल नालकर, मिलिंद नालकर, नितीन नालकर, हर्षद कडू, दौलत नागरे, सचिन वाडेकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे.

​दरम्यान, याबाबत सात्रळ सबस्टेशन इंजिनिअर दिलीप गाढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “तो भाग सात्रळ अंतर्गत असला तरी तांत्रिक देखभाल कोल्हार सबस्टेशनच्या अखत्यारीत येते. ही डीपी तनपुरे यांच्या नावाने असून, वायरमनला तातडीने पाहणीसाठी पाठवले आहे. तारांची उंची वाढवून दिली जाईल आणि गरज पडल्यास नवीन पोल बसवून ही समस्या कायमची मार्गी लावू.” अशी ग्वाही दिली आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !