दिघे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील 'चौथी'च्या विद्यार्थ्याना निरोप!

संगमनेर Live
0
दिघे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील 'चौथी'च्या विद्यार्थ्याना निरोप!

◻️ ​पाया भक्कम असेल तर यशाची इमारत उंच उभी राहते - गट शिक्षणाधिकारी तुंबारे 

संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहुरी तालुक्यातील धानोरे येथील दिघे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. राहुरीचे गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला.

विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे म्हणाले की, “या शाळेने दिलेले संस्कार, शिक्षण आणि मूल्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरतील. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असेल, तरच भविष्यात यशाची मोठी इमारत उभी राहू शकते.”

यावेळी इयत्ता चौथीच्या आरोही अंत्रे, स्वरा अंत्रे, स्वरा निकम, स्वरा खेमनर, रुद्राणी शिंदे, मृणाल जाधव, दिव्या सिनारे, स्वरा शिंदे आणि कार्तिक शिंदे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ‘मिशन आरंभ’ स्कॉलरशिप परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीमुळे आपले व्यक्तिमत्व घडल्याची भावना विद्यार्थ्यानी व्यक्त केली. विशेष म्हणजे, दुसरीतील लहान विद्यार्थ्यानीही आपल्या भाषणातून थोरल्या भावंडांना शुभेच्छा देऊन सर्वाची मने जिंकली.

वर्षभर नियमित शाळेत उपस्थित राहणाऱ्या संस्कृती अंत्रे, स्वरा अंत्रे, स्वरा शिंदे, कार्तिक शिंदे, श्रेयश शिंदे, वेदांत अंत्रे, रुद्र दिघे आणि रोहन अंत्रे या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिस्त आणि नियमिततेबद्दल त्यांचे विशेष कौतुक झाले.

शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इयत्ता चौथीच्या पालकांनी ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत ‘कुसुमाग्रज बाल वाचनालया’साठी एक आकर्षक कपाट भेट दिले. पालकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्गशिक्षिका लता खराडे या पालक - विद्यार्थ्याच्या सहकार्याबद्दल बोलताना भावनिक झाल्या. मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे, अनिल घोलप, संजय बोकंद, सचिन पारेकर, वंदना कोरुलकर आणि सोमनाथ अनाप यांनीही आठवणींना उजाळा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आरती निकम आणि अतुल अंत्रे यांनी पालकांच्या वतीने शाळेच्या कार्याचा गौरव केला.

​कार्यक्रमाची सांगता मिष्टान्न भोजनाने झाली. या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !