सासर आणि माहेर जपण्यात प्रवरेच्या कन्या यशस्वी - सौ. शालीनीताई विखे पाटील

संगमनेर Live
0
सासर आणि माहेर जपण्यात प्रवरेच्या कन्या यशस्वी - सौ. शालीनीताई विखे पाटील

◻️ ​प्रवरेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा उत्साहात संपन्न

संगमनेर LIVE (​लोणी) | “प्रवरा शैक्षणिक संकुलातील शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावरच आम्ही आज विविध क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकलो. शिक्षण आणि कुटुंब यांचा समतोल राखण्याचे बळ आम्हाला प्रवरेच्या मुशीतून मिळाले,” अशा भावना प्रवरा कन्या विद्या मंदिर व प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

​लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने, संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन २००० ते २००३ या कालावधीतील विद्यार्थिनींसाठी आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील होत्या.

​याप्रसंगी शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्या सौ. रेणू पाटील, प्राचार्या सौ. विद्यादेवी घोरपडे, सीमा बढे यांसह विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर संस्कारांची भक्कम पायाभरणी मिळते. आज अनेक विद्यार्थिनी शिक्षण, करिअर आणि कुटुंब यांची यशस्वी सांगड घालत आहेत, याचा अभिमान वाटतो.” यावेळी त्यांनी स्वतःही याच शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

​संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आधुनिक आणि शहरी संकल्पना राबवून विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास साधला जात आहे. प्रवरेचा प्रत्येक विद्यार्थी हा या विशाल परिवाराचा अविभाज्य घटक असून, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर संस्था त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. 

मेळाव्यास उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शालेय जीवनात ज्या विषयांची भीती वाटायची, त्याच विषयांत आज आम्ही प्रगती करून यशस्वी करिअर करत आहोत आणि हे केवळ प्रवरेच्या शिक्षण पध्दतीमुळे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी आणि संस्कारांसाठी आजही आपण प्रवरा संस्थेलाच पसंती देत असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

दरम्यान, ​प्रास्ताविकात प्राचार्या विद्यादेवी घोरपडे यांनी स्पष्ट केले की, प्रवरेचा विद्यार्थी आज केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवत आहे. संस्थेचा भर केवळ शैक्षणिक प्रगतीवर नसून व्यावसायिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोडगे व ऋतुजा जगताप यांनी केले, तर आभार प्राचार्या सौ. रेणू पाटील यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !