संस्कारक्षम पिढीच देशाचा आणि धर्माचा आधारस्तंभ - आमदार अमोल खताळ
◻️ घुलेवाडीतील सोहळ्यात धार्मिक संस्थांच्या पाठीशी उभे राहण्याची दिली ग्वाही
घुलेवाडी येथे आयोजित बालसंस्कार शिबिर आणि गुरुकुलाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार खताळ बोलत होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की, “देश टिकला तरच धर्म टिकणार आहे आणि धर्म टिकला तरच देश सुरक्षित राहणार आहे. या चक्रासाठी संस्कारांची सुरुवात आजच्या पिढीपासून होणे आवश्यक आहे. गुरुकुल आणि धार्मिक संस्थांमार्फत होत असलेले हे संस्कारमय कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आजचे हे लहान वारकरी उद्याच्या काळात अध्यात्माचा आणि उत्तम विचारांचा प्रसार करतील.”
महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. अध्यात्म आणि संस्कारांच्या जोरावरच भारत आज जगासमोर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभा आहे. जर आपली पिढी संस्कारक्षम राहिली, तर भविष्यात भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
तालुक्यातील अध्यात्मिक केंद्रांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, विधायक आणि धार्मिक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. समाजाला दिशा देणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या सोहळ्याला परिसरातील नागरिक, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.