प्रवरेचा कामगार हा आमचा अभिमान - अण्णासाहेब म्हस्के
◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्यात कर्मचाऱ्यांचा सत्कार
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा सहकार, औद्योगिक व शैक्षणिक समूहाच्या उभारणीत कामगारांनी आपले रक्त-आटवून योगदान दिले आहे. त्यांच्या कष्टांमुळेच आज प्रवरा उद्योग समूह भक्कमपणे उभा असून, “प्रवरेचा कामगार हा आपल्या संस्थेचा खरा अभिमान आहे,” अशा शब्दांत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सुरू झालेली ही सत्कार परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम राखली गेली. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सर्व संचालक आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
अण्णासाहेब म्हस्के यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना आवाहन केले की, सेवापूर्तीनंतर उर्वरित आयुष्य आनंदाने जगावे, कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा आणि सामाजिक कार्यातही सक्रिय राहावे. कोणतीही संस्था ही केवळ इमारतींनी नाही, तर तिथल्या कामगारांच्या कष्टांवर उभी राहते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘प्रवरा पॅटर्न’च्या यशाचे संपूर्ण श्रेय कामगारांच्या निष्ठेला दिले. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने जी प्रगती केली आहे, त्यात कामगारांचा वाटा निर्णायक असल्याचे त्यांनी नमूद केले. साखर उद्योगासमोर सध्या अनेक आव्हाने असली, तरी कामगारांच्या हिताला कदापि बाधा येऊ दिली जाणार नाही आणि भविष्यातील प्रत्येक निर्णय घेताना कामगारांचे कल्याणच केंद्रस्थानी ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ज्ञानदेव आहेर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन संचालक अशोक घोलप यांनी केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सेवापूर्तीचे समाधान आणि संस्थेबद्दलची आपुलकी स्पष्टपणे जाणवत होती.