संगमनेरच्या ग्रामीण भागातील १४ विद्यार्थ्याची 'पीएसआय' पदी निवड!

संगमनेर Live
0
संगमनेरच्या ग्रामीण भागातील १४ विद्यार्थ्याची 'पीएसआय' पदी निवड!

◻️ ​जिद्द आणि कष्टाचे फळ; डॉ. जयश्री थोरात यांच्याकडून नवनिर्वाचित अधिकार्‍यांचा गौरव

संगमनेर LIVE | ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा आपली मोहर उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात तालुक्यातील तब्बल १४ ग्रामीण विद्यार्थ्यानी 'पोलीस उपनिरीक्षक' (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, डॉ. जयश्री थोरात यांनी या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या परीक्षेत तालुक्यातील विविध गावांतील मुला-मुलींनी आपल्या कठोर कष्टाच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. यामध्ये काकडवाडी येथील नवनाथ आप्पासाहेब ढवळे, तळेगावचा सचिन नंदू दिघे, वडगाव लांडगा येथील महेश बाळासाहेब बोऱ्हाडे, संगमनेर शहरातील रुपेश नारायण वाकचौरे व वैशाली हरिदास पन्हाळे, समनापूरचा सुरज गौतम शेरमाळे, मोधळवाडीचा चेतन सोमनाथ घाणे, मांडवे बुद्रुक येथील सुनिता रंगनाथ धुळगंड, खरशिंदे येथील रमेश शहाजी पवार, वेल्हाळे येथील निवृत्ती लहानु गुळवे, शेडगावचा सचिन भिकाजी बर्डे, ढोलेवाडी येथील सागर विलास बटवाल, बिरेवाडी येथील संतोष सूर्यभान सागर आणि सावरगाव तळ येथील अक्षय पोपट फापाळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण पार्श्‍वभूमी असूनही या सर्वानी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.

​सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, “संगमनेर तालुक्याने कायमच गुणवत्तेच्या बाबतीत उत्तुंग भरारी घेतली आहे. कठीण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या १४ विद्यार्थ्यानी मिळवलेले यश हे तालुक्यातील नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या यशात विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचा वाटाही तितकाच मोठा असून, कठीण काळात मार्गदर्शक म्हणून उभे राहिल्यामुळेच ही मुले आज अधिकारी होऊ शकली आहेत.”

दरम्यान, ​आगामी काळात पोलीस प्रशासनात जबाबदारी पार पाडताना प्रामाणिकपणा जपावा, कायद्याचे ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि प्रलोभनांना बळी न पडता आपली निर्णयक्षमता वाढवावी, असे आवाहन डॉ. जयश्री यांनी यावेळी नवनिर्वाचित अधिकार्‍यांना केले. तर, तालुक्याचा सन्मान वाढवणाऱ्या या युवा शिलेदारांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !