‘उमेद’च्या माध्यमातून महिला उद्योजकाना नव्या संधी - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
‘उमेद’च्या माध्यमातून महिला उद्योजकाना नव्या संधी - मंत्री विखे पाटील

◻️​ श्रीरामपूरमध्ये पहिले ‘उमेद मॉल’उभारण्याची घोषणा; महिला बचत गटांना साहित्याचे वाटप

संगमनेर LIVE (​श्रीरामपूर) | “विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी नारीशक्तीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज बचत गटांच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील महिला केवळ स्वतःचे घर चालवत नाहीत, तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे,” असा विश्‍वास राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

​श्रीरामपूर तालुका पंचायत समिती आणि कृषि विभाग यांच्या वतीने आयोजित महिला बचत गटांना अनुदान व विविध साहित्याचे वितरण नुकतेच मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर सविस्तर भाष्य केले.

​मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुसार महिला बचत गटांना आता ऑनलाइन मार्केटिंगचे महत्त्व ओळखून पावले उचलावी लागणार आहेत. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून सध्या १ हजारहून अधिक वस्तू ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्या असून, वाढती स्पर्धा पाहता महिलांनी आपल्या उत्पादनांचे पॅकिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगमध्ये अधिक व्यावसायिकता आणणे गरजेचे आहे. महिलांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा स्तरावर ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, तालुका स्तरावरील अशा प्रकारचे पहिले ‘उमेद मॉल’ श्रीरामपूरमध्ये उभारले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

​शासकीय मदतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने आतापर्यत बचत गटांच्या चळवळीला ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जाची वसुली वेळेवर होत असल्याने सरकारला या उपक्रमावर मोठा विश्‍वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘लखपती दीदी' निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, एकल महिलांना देखील कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रकल्प संचालक मंजुषा ठवरकर, संजय फंड, दीपक पठारे, नानासाहेब पवार, शरदराव नवले, बाबासाहेब चिडे, जितेंद्र छाजेंड, श्रीनिवास बिहाणी, गिरीधर आसणे, गटनेत्या वैशाली चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुव्यवस्थितरित्या करण्यात आले होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !