उधळपट्टी टाळून सामुहीक विवाह सोहळ्यांवर भर द्या - पालकमंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
उधळपट्टी टाळून सामुहीक विवाह सोहळ्यांवर भर द्या - पालकमंत्री विखे पाटील

◻️​ खिर्डी येथे २० कोटींच्या पुलाचे भूमीपूजन संपन्न; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा पुनरुच्चार

संगमनेर LIVE (​श्रीरामपूर) | “जगातील सध्याची युध्दजन्य परिस्थिती पाहता, प्रत्येकाने संयम आणि बचतीचे धोरण अवलंबणे गरजेचे आहे. विवाह सोहळ्यांमध्ये होणारी नाहक उधळपट्टी टाळून सामुहीक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा सर्वानी गांभीर्याने विचार करावा,” असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे प्रवरा नदीवर श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून हे काम साकारले जाणार आहे. या प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.

​सध्याच्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून लग्नातील उधळपट्टी थांबवून सामुहीक विवाहांना प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत असून देशातील जनता विकासाच्या विचारांमागे खंबीरपणे उभी असल्याचे चित्र दिसत आहे. वीज संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यात आतापर्यत ३९ हजार सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य सरकारने घेतलेला वीज बिल माफी आणि कर्जमाफीचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

​मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, “नुकत्याच विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे केवळ विकासाच्या राजकारणाचे प्रतीक आहे. देशाला अस्थिर करू पाहणाऱ्या शक्ती आता नेस्तनाबूत झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही युध्दपातळीवर काम करत आहोत. भारनियमनाच्या संकटातून राज्याची सुटका करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर दिला जात असून, महायुती सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन खंबीरपणे पाठबळ देत आहे.”

​स्थानिक विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यातील ५३ किलोमीटर लांबीचे चरींचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच वळणगाव बंधारा आणि मध्यमेश्वर बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारा निधी सरकारकडून तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !