आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने पानेगांवची यशस्वी घोडदौड!
◻️ राज्यस्तरीय पुरस्काराचा वारसा जपत पानेगांव पुन्हा एकदा अव्वल
संगमनेर LIVE (पानेगांव) | नेवासे तालुक्यातील पानेगांव ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरात राबवलेली विविध विकासकामे, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागातून उभे राहिलेले प्रकल्प यांची ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ अंतर्गत गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. १९९९ मधील ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’तील राज्यस्तरीय विजयाची परंपरा कायम राखत पानेगांव पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर चमकण्यासाठी सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ढाले, विस्तार अधिकारी गायकवाड यांचा समावेश होता. यावेळी नेवासे पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार आणि श्री. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पानेगांवच्या विकासाचा आढावा घेताना समितीने विविध उपक्रमांचे कौतुक केले. गावात सुमारे २ हजार झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले असून, विशेषतः ‘मियावाकी’ वनांच्या प्रयोगातून स्वच्छ व हरित गाव निर्मितीचा संकल्प पूर्ण होताना दिसत आहे. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवत गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या पूर्णपणे ‘डिजिटल' करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना अत्याधुनिक शिक्षण मिळत आहे.
पायाभूत सुविधांच्या बाबतीतही गावाने मोठी मजल मारली असून, सुसज्ज ‘ग्रामसंसद’ कार्यालय, अद्ययावत वाचनालय, मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुशोभित मोक्षधाम यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. यासोबतच 'स्त्री जन्माचे स्वागत' आणि 'स्वच्छ माझे अंगण - समृद्ध माझे गाव' यांसारख्या सामाजिक उपक्रमांनी ग्रामविकासाचा पाया अधिक मजबूत केला आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि अस्मितेचे प्रतीक बनला आहे.
नेवासे तालुक्यातील २२ गावांनी या अभियानात सहभाग घेतला असला, तरी पानेगांवने आपल्या शिस्तबध्द कामामुळे आघाडी घेतली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची ‘पानेगांवकरांची वृत्ती’ प्रेरणादायी असल्याचे मत तपासणी समितीने व्यक्त केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वीरूढ पुतळ्यामुळे ओळख निर्माण झालेल्या पानेगांवने १९९९ पासून लोकनेते सुनील गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गती कायम ठेवली आहे. डिजिटल शाळा, वृक्षसंवर्धन आणि लोकसहभागामुळे हे गाव पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक येतात. या अभियानातही आमचे गाव नक्कीच राज्यस्तरावर बाजी मारेल, असा आम्हाला विश्वास आहे.” असे माजी सरपंच संजय जंगले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी सरपंच सौ. निकीता भोसले-आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, आरोग्य अधिकारी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.