विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला चिंताजनक - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला चिंताजनक - बाळासाहेब थोरात

◻️​ शासनाकडून हल्लेखोरांना पाठीशी घातले जाणे दुर्दैवी

​संगमनेर LIVE | वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वाना सोबत घेऊन जाणारा आणि मानवतेची शिकवण देणारा विचार आहे. मात्र, अलीकडच्या काळात हा विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक आहेत, अशा शब्दांत काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आळंदी येथील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 

संत परंपरेचा आणि समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे याने आळंदी येथे शाईफेक केली. या घटनेवर भाष्य करताना थोरात म्हणाले की, लवांडे यांच्यावरील हा हल्ला भ्याड आणि दुर्दैवी आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगातही ते अत्यंत धीरोदत्तपणे सामोरे गेले, हीच खरी संतांची शिकवण आहे.

​संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल काळातही आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे लढण्याची शिकवण समाजाला दिली आहे. विकास लवांडे हे आज तोच वारसा पुढे नेत आहेत. जर कुणाला त्यांच्या विचारांशी असहमती असेल, तर त्यांनी लोकशाही मार्गाने स्वतःचा विचार मांडून प्रतिवाद करायला हवा होता. 

मात्र, विचारांचा मुकाबला विचाराने न करता, अशा प्रकारे शाईफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड आणि हनुमंत पवार यांच्यावरही असेच हल्ले झाले होते, ही हल्ल्यांची मालिका महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला न शोभणारी आहे.

​यात अधिक खेदजनक बाब म्हणजे, अशा प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तींना शासन पाठीशी घालत आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली. समाजात विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्याची जबाबदारी सरकारची असताना, हल्लेखोरांना अभय मिळणे हे दुर्दैवी आहे. वारकरी संप्रदायातील सर्व अनुयायांनी या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने आणि जागरूकपणे पाहिले पाहिजे. विचारांचा लढा विचारांनीच लढला जावा आणि हिंसेला समाजात कोणत्याही प्रकारे स्थान असू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !