आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यत पोहचणे हीच खरी राष्ट्रउभारणी! - संजय किर्लोस्कर
◻️ प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा २० वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | “आरोग्यसेवेची खरी मोजदाद ही केवळ शहरांतील चकचकीत इमारती किंवा सुविधांवरून ठरत नाही, तर ती सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत किती प्रभावीपणे आणि करुणेने पोहोचते, यावर ठरते. मजबूत आरोग्य सेवा हा राष्ट्र उभारणीचा सर्वात भक्कम स्तंभ आहे,” असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले.
लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) च्या २० व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील होते.
आपल्या भाषणात संजय किर्लोस्कर यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “लोणी आणि किर्लोस्करवाडी यांसारखी गावे आज महाराष्ट्राच्या नकाशावर विकासाचे दीपस्तंभ म्हणून ओळखली जातात, याचे श्रेय या महान नेत्यांच्या दूरदृष्टीला जाते.”
पदवीप्राप्त डॉक्टरांना मोलाचा सल्ला देताना त्यांनी नमूद केले की, लोक तुम्ही दिलेली औषधे कदाचित विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी केलेले माणुसकीचे वर्तन कधीच विसरणार नाहीत. पदवी तुम्हाला व्यवसाय देईल, पण करुणा तुम्हाला जीवनाचा खरा उद्देश देईल. आपल्या कारकिर्दीतील काही काळ ग्रामीण भागातील सेवेसाठी खर्च करा, कारण तिथे तुमच्या योगदानाची देशाला खरी गरज आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वैद्यकीय पदवी हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ती मानवतेप्रती स्वीकारलेली आयुष्यभराची बांधिलकी आहे. आधुनिक ज्ञानासोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करणे वैद्यकीय क्षेत्रात अनिवार्य आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठ केवळ डॉक्टर घडवत नसून, विखे पाटील यांच्या परंपरेनुसार विद्यार्थ्यामध्ये सेवा, प्रेम आणि करुणेची मूल्ये रुजविण्याचे काम करत आहे. कोविडनंतरच्या काळात निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी हे तरुण पदवीधर सज्ज असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले.
या सोहळ्यात विविध शाखांमधील एकूण ३२२ विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, सौ. मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, विश्वसराव आहेर, एम. एम. पुलाटे, स्वप्नील सावंत, पंजाबराव आहेर, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे आणि विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वार्षिक अहवाल वाचन कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपीका भालेराव यांनी केले. या सोहळ्यासाठी विद्यार्थी, पालक आणि प्रवरा परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.