लोकसेवेसाठी सदैव कटिबद्ध - आमदार अमोल खताळ
◻️ धांदरफळ खुर्द येथे ३६ गावांतील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप
संगमनेर LIVE | “लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हाच सर्वोच्च असतो. पराभव मोठ्या मनाने स्वीकारून त्याचे आत्मचिंतन करणे हीच लोकशाहीची पद्धत आहे. जनता हीच खरी न्यायाधीश असून, निवडणुकीच्या निकालानंतरही संगमनेर तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहीन,” असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
धांदरफळ खुर्द ग्रामस्थ आणि धर्मनाद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संगमनेर खुर्द आणि धांदरफळ गटातील ३६ गावांतील भजनी मंडळांना आमदार अमोल खताळ आणि अनिल महाराज देवळेकर यांच्या हस्ते भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले.
आमदार खताळ म्हणाले की, “स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी या गावाचे नाव देशाच्या नकाशावर नेले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच मी समाजकारणात उतरलो आहे. सर्वसामान्य जनतेने देव, देश आणि धर्म टिकविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती मी प्राणपणाने जपेन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय आहे.”
आमदारकीची हवा कधीही डोक्यात जाणार नाही, असे सांगत त्यांनी तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला. “गेल्या अनेक वर्षापासून संगमनेर तालुक्यातील जनतेला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न माझ्या माध्यमातून सुटत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. विकासकामांच्या जोरावर जनता नक्कीच साथ देईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अनिल महाराज देवळेकर यांनी आमदार खताळ यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “धर्मसत्ता टिकवण्यासाठी राजसत्तेची जोड आवश्यक असते. अमोल खताळ यांच्या रूपाने तालुक्याला एक कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ नेता मिळाला आहे. धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येकाने अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” असे आवाहन केले.
दरम्यान, या सोहळ्याला यादव महाराज देवगिरे, अर्जुन महाराज खताळ, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खताळ, त्रिंबक खताळ, धोंडीबा खताळ, मंगल खताळ, सौ. निलम खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष कानवडे, भागवत कानवडे, सतीश गोपाळे, कोंडाजी कडनर, सागर खताळ, सतीश कोकणे, मिलिंद खताळ, उमेश कोकणे, मिनानाथ खताळ, दत्ता शेटे पंकज जोंधळे, संकेत खुळे, महेश सातपुते आणि धांदरफळ तरुण मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.