गर्भलिंग निदान रॅकेटमधील आणखीन एका डॉक्टरांसह दोन एजंट गजाआड!

संगमनेर Live
0
                             ***AI फोटो***

गर्भलिंग निदान रॅकेटमधील आणखीन एका डॉक्टरांसह दोन एजंट गजाआड!

◻️ ​जिल्ह्यातील आतापर्यतची सर्वात मोठी कारवाई; रॅकेटचे धागेदोरे थेट पुण्यापर्यत


संगमनेर LIVE (​लोणी) |
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाईत दोन डॉक्टर आणि मुख्य एजंटसह एकूण पाच जणांना आतापर्यत अटक करण्यात आली असून, पोलिसांनी २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​२९ एप्रिल २०२६ रोजी निळवंडे कालव्या शेजारील एका खोलीत महिलांकडून १० हजार रुपये घेऊन बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणी पोलीस आणि वैद्यकीय पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचून धाड टाकली असता, घटनास्थळावरून डॉ. राहुल भनगे आणि अभिजीत भुसाळ या मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या धाडीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, ४ मोबाईल फोन, ५९ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या स्विफ्ट, एर्टिगा व वॅगनआर अशा तीन आलिशान कार जप्त करण्यात आल्या होत्या.

​प्राथमिक अटकेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची व्याप्ती वाढवली असता, गर्भवती महिला आणि डॉक्टरांमध्ये समन्वय साधणाऱ्या मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला. या तपासात प्रदिप ढगे आणि निलेश भवर या दोन एजंटचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली. या आरोपींच्या सखोल चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचे नाव समोर आले असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांनाही या गुन्ह्यात अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे धागेदोरे पुण्यातील काही डॉक्टरांपर्यंत पोहोचले असून, अटक करण्यात आलेला एजंट प्रदीप ढगे याच्याकडून लिंग निदानासाठी वापरले जाणारे आणखी एक मशीन जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, नव्याने अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना आज राहाता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस हवालदार दादासाहेब लोढे, संदिप दरंदले, अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, असिर सय्यद, साईनाथ राशिनकर, सचिन शेवाळे, श्री. भोईटे, मनिषा गिरी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच डॉक्टर, एजंट आणि दलाल यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली असुन, पोलीसांच्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !