संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने गुटख्यासह ७० लाखांचा मुद्देमाल केला जप्त!

संगमनेर Live
0
संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने गुटख्यासह ७० लाखांचा मुद्देमाल केला जप्त!

◻️​ पोलीस अधीक्षकांचा अवैध धंद्यांवर 'प्रहार'; गुजरातहून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो पकडला


​संगमनेर LIVE | अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे.

हिवरगाव टोल नाका येथे लावलेल्या सापळ्यात सुमारे ६९ लाख ७९ हजार ४०० रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला असून यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी, ५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुजरात राज्यातील वापी येथून एका आयशर टेम्पोमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू भरून तो संगमनेरमार्गे पुण्याकडे नेला जाणार आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना सोबतीला घेतले आणि हिवरगाव टोल नाक्यावर सापळा लावला.

सापळा लावून थांबलेले असताना संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने येणारा एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो पोलिसांना दिसून आला. संशयित गाडी अडवून पोलिसांनी चालकाला बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी गाडीत असलेल्या कन्हैयालाल काळूराम गेहलोत (रा. राजस्थान), प्रदीपकुमार हरीशंकर कुंवार (रा. मध्यप्रदेश) आणि लक्ष्मण बस्तीराम पवार  (रा. राजस्थान) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, हा माल पुण्यातील नीलेश ललवानी याच्याकडे नेण्यात येत असल्याचे सांगितले.

या धाडीमध्ये पोलिसांनी २८ लाख ४४ हजार रुपयांचा आरएमडी. पानमसाला, ४ लाख ५६ हजार रुपयांची एम सेंटेड तंबाखू, १२ लाख ६ हजार ४०० रुपयांचा रजनीगंधा पानमसाला आणि २ लाख ४३ हजार रुपये किमतीची तुलसी जाफरानी जर्दा तंबाखू असा एकूण ४७ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. याव्यतिरिक्त २२ लाख रुपये  किमतीचा आयशर टेम्पो आणि ३० हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण ६९ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.रं.नं. २४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर यांचे पथकाने केली असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !