भंते सुमेध बोधी यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान!
◻️‘राजगृह’ येथे मिराताई आंबेडकरांच्या हस्ते गौरव
संगमनेर LIVE | बौध्द धम्मप्रचार आणि सामाजिक कार्यात आयुष्य समर्पित करणारे भंते डॉ. सुमेध बोधी यांच्या बहुआयामी कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मेक्सिकोतील प्रसिध्द टोलेसा विद्यापीठाने त्यांना मानाची ‘डॉक्टरेट’ पदवी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात बहाल करण्यात आली.
भंते सुमेध बोधी हे ‘दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात बौध्दाचार्य श्रामणेर शिबिरे, धम्म दीक्षा सोहळे आणि अशा २४ प्रकारच्या शिबिरांचे यशस्वी नियोजन केले जाते. नुकतेच संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्रामणेर शिबीर पार पडले.
नाशिक येथे झालेल्या अधिकृत समारंभात विद्यापीठाचे भारतीय समन्वयक डॉ. व्ही. कट्टाबोमन यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी समता सैनिक दलाचे बीड येथील राजेंद्र ससाणे, अहिल्यानगर येथील रविंद्र घोडके, प्रा. अनिल मुन्तोडे आणि सागर खरात उपस्थित होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टरेट मिळाल्यानंतर, मुंबईतील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी मिराताई आंबेडकर यांच्या हस्ते भंतेजींचा सत्कार करण्यात आला. भंते डॉ. सुमेध बोधी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.