चणेगावमध्ये वाळू उपशासाठी आदिवासी दफनभूमीतून रस्ता

संगमनेर Live
0
चणेगावमध्ये वाळू उपशासाठी आदिवासी दफनभूमीतून रस्ता

◻️ आदिवासी बांधवांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे वाळू उपसा करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी आदिवासी आणि दलित समाजाच्या दफनभूमीतून उत्खनन करून रस्ता तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

​चणेगाव येथील गट नंबर १ मध्ये  दफनभूमी आहे. या ठिकाणी आदिवासी आणि शेजारी दलित समाजातील बांधवांनी आपल्या पूर्वजांचे आणि नातेवाईकांचे मृतदेह दफन केले आहेत. ही जागा समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रध्देचा विषय आहे. मात्र, नदीपात्रातून वाळू उपसा करण्याच्या नावाखाली काही अज्ञात व्यक्तींनी या दफनभूमीचे बेकायदेशीर उत्खनन केले आणि तिथून वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार केला आहे. यामुळे दफन केलेल्या मृत व्यक्तींच्या जागेचा अवमान झाला असून आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप स्थानिक आदिवासी बांधवांनी केला आहे.

​या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेत संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण मुंढे, तहसीलदार धीरज मांजरे, आश्‍वीचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर दफनभूमीचा अपमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या कृत्याबद्दल ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी देखील केली आहे.

तसेच प्रशासनाने आदिवासी आणि दलित समाजाच्या भावनांचा विचार करून गावपातळीवर सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्वरित पावले उचलावीत आणि न्याय द्यावा, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या निवेदनाच्या प्रती अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिबलापूरचे मंडळ अधिकारी, आश्‍वीचे पोलीस निरीक्षक, चणेगावचे महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांना दिल्या आहेत. तसेच, राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून याबाबत निवेदन देणार असल्याची माहिती आदिवासी बांधवांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !