घारगाव येथील हॉटेल फोडणारी नाशिकची आंतरराज्य टोळी जेरबंद!
◻️ स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंदरमाळवाडी येथे एका धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. येथील ‘हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारू, सिगारेट आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर असा एकूण ३ लाख ६ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी फिर्यादी किशोर डोके यांच्या तक्रारीवरून घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने तपास पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, नाशिकमधील सराईत गुन्हेगार हसन कुट्टी याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाशिकमधील म्हाडा बिल्डिंग, वडाळा परिसरात सापळा रचून हसन कुट्टी, आकाश सूर्यवंशी आणि झारखंडचा मेहताब अन्सारी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी झारखंडमधील त्यांचा फरार साथीदार बंटी दास याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, चोरीचा हा माल नाशिकमधील पळसे येथील हॉटेल चालक उगले यांना विकण्यात आला होता. तसेच उगले याने चोरीसाठी वाहनही उपलब्ध करून दिले होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे किरण उगले याला अटक केली असून, त्याच्याकडून ४ लाख ५ हजार १६० रुपयांची विदेशी दारू, दीड लाख रुपये किमतीची टाटा इंडिका कार, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी घारगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, सोनल भागवत आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.