राजकीय हस्तक्षेपामुळे सरळ असलेला संगमनेरचा रेल्वे मार्ग बदलला - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
राजकीय हस्तक्षेपामुळे सरळ असलेला संगमनेरचा रेल्वे मार्ग बदलला - बाळासाहेब थोरात

◻️ ​ऊस विकास मेळाव्यात ६५ वर्षीय धाडसी गंगुबाई आजींचा विशेष गौरव!

संगमनेर LIVE | “गेल्या चाळीस वर्षात सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करून हा तालुका आम्ही विकासकामांच्या जोरावर उभा केला. विशेषतः पठार भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुळा नदीवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. मात्र, ज्यांना तालुक्याचा हा सुवर्णकाळ आणि विकास पाहावत नाही, अशा लोकांनी निव्वळ राजकीय द्वेषापोटी तालुक्याला वरदान ठरणारी नाशिक-पुणे रेल्वे पळवली आहे,” अशी घणाघाती टीका काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच सध्या तालुक्यात वाढलेली हप्तेखोरी आणि टक्केवारी हा अत्यंत गंभीर व चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​साकुर येथे आयोजित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

​आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात म्हणाले की, “माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यातून आपण मुळा नदीवर जागोजागी बंधारे बांधून पठार भाग सुजलाम सुफलाम केला. तालुक्याचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात वाढवला. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी अत्यंत सरळ आणि सोयीचा असणारा ‘साकुर मार्ग’ निश्चित करण्यात आला होता. 

यासाठी जमीन संपादनाचे काम होऊन शेतकऱ्यांना सुमारे ५०० कोटी रुपयांचे वाटपही झाले होते. त्यावेळी जीएमआरटी प्रकल्पाचे कोणतेही तांत्रिक कारण पुढे आले नव्हते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे हा मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाला आणि आता ही हायस्पीड रेल्वे चक्क गुजरातला मंजूर झाल्याचे ऐकिवात येत आहे. यामुळे अनेक शंका उपस्थित होत असून, संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्ग येथेच आणण्यासाठी आपला संघर्ष आणि पाठपुरावा सुरूच राहील.”

​“आम्ही २०२४ मध्ये तालुक्यात अनेक महत्त्वाचे रस्ते मंजूर करून आणले होते. मात्र, सत्तेचा गैरवापर करून नव्या लोकांनी ही मंजूर कामे रद्द केली. जे स्वतः कामांना स्थगिती देतात, तेच आता विकासाच्या गप्पा मारत आहेत,” असा टोला लगावत थोरात यांनी सध्या तालुक्यात सुरू असलेल्या टक्केवारी आणि हप्तेखोरीच्या वाढत्या प्रकारांवर तीव्र चिंता व्यक्त केली.

​सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाचा उल्लेख करत बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “आपल्या साखर कारखान्याचे १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी किमान १०० टन ऊस उत्पादनाचे ध्येय ठेवले पाहिजे.”

याच मेळाव्यात बोलताना कृषि शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुशील यांनी उत्पादकता वाढीसाठी ऊस बेणे बदलण्यावर भर दिला. ते म्हणाले की, ‘सीओ २६५’ या वाणाची उत्पादकता आता कमी झाली असून, त्याला ‘को ८६०३२’ हा सर्वोत्तम पर्याय आहे; कारण या वाणाला फुटवे जास्त मिळतात, खोडवा चांगला येतो आणि हा ऊस अत्यंत कमी कालावधीत तयार होतो. 

तर दुसरीकडे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे यांनी जमिनीच्या खालावणाऱ्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. पाण्याचा अतिवापर आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमीन खराब होते, हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड नेहमी दक्षिण-उत्तर दिशेने करण्याचा मोलाचा सल्ला दिला, जेणेकरून पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादकता वाढेल.

​या मेळाव्यात खरशिंदे येथील ६५ वर्षीय आजी गंगुबाई शिवराम गायकवाड यांनी घरात घुसलेल्या बिबट्याला अत्यंत धाडसाने खोलीत कोंडून जेरबंद केले होते. त्यांच्या या अचाट धैर्यामुळे संपूर्ण गावावरील मोठे संकट टळले. या धाडसी कामगिरीबद्दल बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गंगुबाई आजींचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात आजींच्या शौर्याला दाद दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !