आढळा धरणासाठी ३० कोटीचा निधी मंजूर - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
आढळा धरणासाठी ३० कोटीचा निधी मंजूर - मंत्री विखे पाटील

◻️ जवळे कडलग, वडगाव लांडगा, धांदरफळ आदि गावांना होणार लाभ

​संगमनेर LIVE | बिताका धरणातील पाण्याद्वारे आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ३० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू झाले असून, यामुळे आढळा खोऱ्यातील शेतीसाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

उर्ध्व प्रवरा डावा कालव्यावरील काटनियामक आणि अतिवाहकाच्या पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. चार कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे जवळे कडलग, वडगाव लांडगा आणि धांदरफळ बुद्रुक या गावांना मोठा लाभ होणार आहे. या प्रणालीमुळे धामोडी नाल्यावरील सात बंधारे भरण्यास मदत होणार असून, परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांपर्यत पोहोचवण्याचा दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे. आढळा खोऱ्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बिताका धरणातील पाणी वळवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी सर्वेक्षणास २० लाख रुपयांचा निधी दिला असून, लवकरच ३० कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली जाईल. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या तांत्रिक कामांच्या यशस्वी पूर्ततेसाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मंत्री विखे पाटील यांनी विशेष कौतुक केले. 

आमदार अमोल खताळ म्हणाले, “आजचा दिवस या भागासाठी आनंदाचा आहे. निवडणुकांचे आश्‍वासन न देता प्रत्यक्षात काम करून दाखवणारे हे सरकार आहे.” म्हाळादेवीपासूनचा इतिहास पाहता, विरोधकांनी या भागाला पाण्यापासून वंचित ठेवले होते, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. ​तळेगाव-साकूर भागातील पाण्याचे स्वप्नही लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन आमदार खताळ यांनी दिले.

दरम्यान, या कार्यक्रमाला भजपचे श्रीकांत गोमासे, दिलीपराव शिंदे आबासाहेब थोरात, वैभव लांडगे, जनार्दन आहेर, डॉ. सोमनाथ कानवडे, जलसंपदा विभागाचे अभियंता अमोल कवडे, प्रदीप हापसे, प्रमोद माने यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !