संगमनेर शहरातील रस्त्यांवरील वृक्षसंवर्धनासाठी थोरात कारखान्याचा पुढाकार!

संगमनेर Live
0
संगमनेर शहरातील रस्त्यांवरील वृक्षसंवर्धनासाठी थोरात कारखान्याचा पुढाकार!

◻️ ​भर उन्हाळ्यात टॅकरद्वारे झाडांना दिले जातेय पाणी

​संगमनेर LIVE | वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे वृक्षवल्ली कोमेजून जाण्याची शक्यता असताना, संगमनेरातील इंजिनिअरिंग महाविद्यालय ते बस स्थानक या ‘लक्ष्मी रोड'वरील वृक्षांची तहान भागवण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाकडून दररोज या झाडांना मोफत पाणी दिले जात असून, हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरत आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सुरू केलेल्या ‘दंडकारण्य अभियाना'तून संगमनेर तालुका आणि शहरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी राहिली. त्यांच्याच प्रेरणेतून आज तालुक्यातील उघडे-बोडके डोंगर हिरवेगार झाले असून, शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या लक्ष्मी रोडवर (हॅप्पी हायवे) विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे डोलत आहेत.

रस्त्याच्या दुभाजकातील या झाडांना जगवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, त्यात दिसून येत असलेल्या उदासीनतेवर मात करत कारखाना प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 

याबाबत बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून दररोज टॅकरद्वारे या वृक्षांना पाणी दिले जात आहे. उन्हाळ्यात झाडांचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.”

काही विकृत प्रवृत्तींकडून रस्त्यांवरील झाडे मोडण्याचे प्रकार होत आहेत, तसेच डोंगरांना आगी लावल्या जात आहेत. यावर भाष्य करताना सौ. दुर्गा तांबे म्हणाल्या की, “पर्यावरण संवर्धनात कोणीही राजकारण करू नये. जर कोणी झाडे मोडताना किंवा नुकसान करताना आढळले, तर नागरिकांनी तातडीने नगरपालिका व पोलीस प्रशासनाला कळवावे. वृक्षसंवर्धन ही आपली सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे.”

दरम्यान, ​सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या या ‘ग्रीन’ उपक्रमाचे शहरवासीयांकडून आणि वृक्षप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !