धाडसी गंगुबाई गायकवाड यांना ‘हिरकणी’ पुरस्कार द्या!

संगमनेर Live
0
धाडसी गंगुबाई गायकवाड यांना ‘हिरकणी’ पुरस्कार द्या!

◻️ आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांनी घरात अचानक घुसलेल्या बिबट्याचा अजिबात न घाबरता धैर्याने सामना करत स्वतःचा व आपल्या मुलाचा जीव वाचवला. एवढेच नव्हे तर प्रसंगावधान राखत त्यांनी त्या बिबट्याला घरातच कोंडून ठेवण्याचे अद्वितीय धाडस केले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कृतीबद्दल शासनाने त्यांना मानाचा ‘हिरकणी पुरस्कार’अथवा ‘शौर्य पुरस्कार’ देऊन गौरवावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

खरशिदें येथील गंगुबाई गायकवाड या घरात स्वयंपाक करत असताना अचानक बिबट्या घरात शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र त्यांनी घाबरून न जाता अत्यंत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत आपल्या मुलाला सुरक्षित केले. त्यानंतर मोठ्या हिमतीने त्या बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली.

आमदार अमोल खताळ यांनी गंगुबाई गायकवाड यांच्या शौर्याचे कौतुक करत त्यांना शासनस्तरावर योग्य सन्मान मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डी येथे कार्यक्रमानिमित्त आले असता आमदार खताळ यांनी त्यांची भेट घेत गंगुबाई यांच्या धाडसाची माहिती दिली व त्यांना ‘हिरकणी पुरस्कार’ देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

“एका सामान्य ग्रामीण महिलेने अत्यंत बिकट आणि जीवघेण्या प्रसंगी दाखवलेले धाडस हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आपल्या कुटुंबाचे संरक्षण केले आणि प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टाळली. अशा धाडसी महिलांचा शासनाने योग्य सन्मान केल्यास समाजातील इतर महिलांनाही संकटसमयी धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा मिळेल. गंगुबाई गायकवाड यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने शौर्याचे उदाहरण आहे.” असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !