चिंचपूर शिवारात जबरी चोरीचा प्रयत्न फसला
◻️ पोलिसांसह ग्रामस्थांकडून रात्रभर शोधमोहिम
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील चिचंपूर शिवारात शनिवारी (दि. २) सायंकाळी एका धाडसी महिलेमुळे मोठी चोरी टळली आहे. घरात घुसलेल्या चोरट्याने चाकूचा धाक दाखवूनही डगमगून न जाता, या महिलेने लोखंडी रॉड घेऊन प्रतिहल्ला केल्याने चोरट्यांला पळ काढावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर शिवारातील ‘आठ मोऱ्या’ परिसरात भारत धोंडीराम अनर्थे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शनिवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घरातील महिला नेहमीची कामे करत असताना, अचानक एक अज्ञात चोरटा घरात घुसला. त्याने कपाटाची आणि सामानाची उचकापाचक करण्यास सुरुवात केली. नेमकी कशाचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी महिला पोहोचली असता, चोरट्याने तिला चाकूचा धाक दाखवून शांत बसवण्याचा प्रयत्न केला.
चोरट्याला पाहून महिला घाबरली, परंतू तिने प्रसंगावधान राखत आरडाओरडा सुरू केला. इतक्यावरच न थांबता, जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून ती चोरट्याच्या अंगावर धावून गेली. महिलेचे हे रौद्र रूप पाहून चोरट्याने तेथून धूम ठोकली. घराबाहेर आणि आत मिळून साधारण दोन ते तीन चोरटे असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक मदतीला धावून आले, तोपर्यत चोरटे पसार झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतेही आर्थिक नुकसान अथवा मुद्देमाल चोरीला गेला नाही.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी तात्काळ सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गावातील १५० ते २०० तरुण आणि ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात रात्री दोन वाजेपर्यत शोधमोहीम राबवली, मात्र, चोरट्यांचा मागमूस हाती लागला नाही.
रविवारी (दि. ३) सकाळी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथक तपासकामी घटनास्थळी आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्यासह पोलीस पाटील दत्तात्रेय तांबे, अशोक थेटे, विवेक तांबे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, चिंचपूरमधील या घटनेचा अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झाला नसला, तरी सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट हे गुन्हेगाराचे धागेदोरे शोधत आहेत. नागरीकांनी खबरदारी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.