सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी पिंप्री-लौकी अजमपूर ग्रामस्थ आक्रमक

संगमनेर Live
0
सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी पिंप्री-लौकी अजमपूर ग्रामस्थ आक्रमक

◻️ चोरांचा सुळसुळाट आणि बिबट्याची दहशत; जन आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा


संगमनेर LIVE |
संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथील ग्रामस्थांना गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरत असून, यामुळे चोरांचा सुळसुळाट आणि बिबट्याची दहशत वाढली आहे. महावितरणकडे वारंवार दाद मागूनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता जनआंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यांनी दिली.

गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आश्‍वी येथील सब स्टेशनच्या ज्युनिअर इंजिनिअर यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंधरा दिवसांपासून परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून बिबट्याचा वावरही वाढला आहे. अशा परिस्थितीत वीज खंडित राहिल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याच्या उकाड्यामुळे लहान मुले आणि वृध्द हैराण झाले आहेत. रात्री ६ ते ९ या मोक्याच्या वेळेतच वीज नसल्याने घरातील कामे खोळबत आहेत. “बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ले करत आहे, त्यातच अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडत आहेत. विनंती करूनही अधिकारी ऐकत नसतील, तर आम्ही शांत बसणार नाही," अशा भावना सामाजिक कार्यकर्ते भारतराव गीते यांनी व्यक्त केल्या.

ग्रामस्थांनी राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे. महावितरणने जर तातडीने वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सरपंच सौ. संगीता गिते, उपसरपंच बाजीराव गीते, माजी उपसरपंच दौलत दातीर यांच्यासह राजेंद्र गीते, संतोष गीते, अशोक गीते, बाबासाहेब दातीर, मोहन दातीर आणि श्री. भुसारी आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !