‘पद्मश्री’ सन्मानामुळे संगमनेरचे नाव देशपातळीवर झळकले - आमदार अमोल खताळ
◻️ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या कलेच्या प्रवासाला केंद्र सरकारची मानाची पावती
संगमनेर LIVE | तमाशा या पारंपरिक लोककलेला जगभरात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ लोककलावंत आणि तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारतर्फे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा प्रतिष्ठित सोहळा पार पडला. या गौरवशाली क्षणामुळे संगमनेरकरांचे नाव देशपातळीवर झळकले आहे.
रघुवीर खेडकर यांनी गेली अनेक दशके तमाशा कलेची सेवा केली. मात्र, त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल योग्य स्तरावर घेतली जात नव्हती. संगमनेरमधील राजकीय परिवर्तनानंतर, आमदार अमोलदेखील खताळ यांनी रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यांसाठी सरकारकडे आग्रह धरला होता. त्यासाठी आमदार खताळ यांनी शासन स्तरावर देखील पाठपुरावा केला. सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात खताळ यांनी खेडकर यांच्या नावाची शिफारस केली होती. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि खेडकर यांच्या कार्यावर ‘पद्मश्री’ची मोहोर उमटली.
महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष असलेले रघुवीर खेडकर यांनी तमाशा या कलेला ग्रामीण संस्कृतीच्या चौकटीतून बाहेर काढून थेट दिल्लीसारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन ठेवले. आपल्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी या लोककलेला ग्लॅमर आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या सन्मानाने केवळ संगमनेरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांचा गौरव झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर तमाशा कलेसाठी संघर्ष केला. ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या सन्मानामुळे केवळ संगमनेरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा कलेची मान उंचावली आहे.” असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर लाईव्ह शी बोलताना काढले.