संगमनेरचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांच्या पद्मश्री पुरस्काराने जिल्ह्याचा मोठा सन्मान!
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांकडून कौतुकाचा वर्षाव
संगमनेर LIVE | महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या तमाशा या लोककलेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे, संगमनेर तालुक्याचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित या दिमाखदार सोहळ्यात खेडकर यांचा हा गौरव झाल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
रघुवीर खेडकर यांनी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा तमाशाचा समृध्द वारसा केवळ जोपासलाच नाही, तर तो अधिक उंचीवर नेऊन ठेवला आहे. डिजिटल युगाच्या प्रभावात लोककला लोप पावण्याची भीती असताना, खेडकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तमाशाला नवनवीन ओळख मिळवून दिली. महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांच्या समस्यांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र तमाशा मालक मंडळाचे ते खंदे अध्यक्ष आहेत.
रघुवीर खेडकर यांच्या या यशाबद्दल कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. थोरात म्हणाले की, “रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, ती महाराष्ट्राच्या लोककलेची आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी ओळख आहे. तमाशा क्षेत्रातील एका सच्चा कलावंताचा हा योग्य सन्मान झाला आहे.”
दरम्यान, खेडकर यांच्यावर सांस्कृतिक वर्तुळासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.