पारेगाव बुद्रुक पालखी मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही
संगमनेर LIVE | दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यात आगमन होणार आहे. वारकरी भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पारेगाव बुद्रुक व काकडवाडी परिसरातील पालखी मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत, आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
पालखी सोहळ्याच्या कालावधीत या मार्गावर वारकऱ्यांची मोठी वर्दळ असते. रस्ता नादुरुस्त असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी सुरेश दळवी आणि किशोर गडाख यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार अमोल खताळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पालखी मार्गाची दुरुस्ती वेळेत पूर्ण होत असल्याने येणाऱ्या आषाढी वारीत वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे प्रवासातील अडथळे दूर होऊन पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.