अकोल्यात किसान सभेचे तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून तीव्र आंदोलन

संगमनेर Live
0
अकोल्यात किसान सभेचे तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून तीव्र आंदोलन

◻️ ​कांद्याला किमान ३ हजार रुपये भाव आणि अनुदान देण्याची मागणी

संगमनेर LIVE (​अकोले) | सध्याच्या घडीला कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव आणि सरकारी धोरणांच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारवर आपला रोष व्यक्त केला.

​शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडताना कांद्याला किमान ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा आणि ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात कांदा विकला आहे, त्यांना प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान देऊन हा निर्णय संपूर्ण राज्यभर त्वरित लागू करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

​आंदोलनापूर्वी अकोले शहरातून शेतकऱ्यांनी जोरदार मिरवणूक काढली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी आणि किसान सभेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आंदोलनादरम्यान वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. वारंवार लादली जाणारी निर्यात बंदी आणि साठवणूक क्षमतेचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, वाहतूक, मजुरी आणि शेतीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली. तसेच, कांद्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणीही करण्यात आली. 

याप्रसंगी किसान सभेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्‍वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार, योगेश भरितकर, बाळासाहेब मधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !