लोणीतील तीन विद्यार्थी मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

संगमनेर Live
0
लोणीतील तीन विद्यार्थी मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

◻️ चंद्रपूर येथील हृदयद्रावक घटना; उपचारापूर्वीच तिघांची प्राणज्योत मालवली

संगमनेर LIVE (लोणी) | ​राहाता तालुक्यातील लोणी येथील पायरेन्स संस्था संचलित व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्याचा चंद्रपूर गावाजवळील साठवण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. २८) सायंकाळी घडली. या घटनेमुळे लोणीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाविद्यालयीन वातावरणात शोककळा पसरली आहे.

मृत विद्यार्थ्यामध्ये अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्‍वर नगर, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. हे तिघेही मित्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. आज गुरुवारी सुट्टीचा दिवस असल्याने तिघेही पोहण्यासाठी चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात गेले होते.

तिघेही मित्र तलावात पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने, पाण्याचा प्रवाह किंवा खोल डबक्यात ते अडकले आणि दुर्दैवाने पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासाअंती मृत घोषित केले.

दरम्यान, ​या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. लोणी पोलिसांकडून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !