बाळासाहेब थोराताकडून पिंपरने येथील ठोंबरे कुटुंबीयांचे सांत्वन

संगमनेर Live
0
बाळासाहेब थोराताकडून पिंपरने येथील ठोंबरे कुटुंबीयांचे सांत्वन

◻️ चिमुकली बचावली; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने तालुका गहिवरला

​संगमनेर LIVE | नाशिकजवळील कश्यपी धरणावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या संगमनेर. तालुक्यातील पिंपरने येथील एकाच कुटुंबातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेने पिंपरनेसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुटुंबाची नुकतीच बाळासाहेब थोरातानी भेट घेऊन सांत्वन केले आहे.

मूळचे पिंपरने येथील रहिवासी असलेले आणि नाशिकच्या म्हसरूळ-मखमलाबाद परिसरात वास्तव्यास असलेले सिव्हिल इंजिनीयर सचिन ठोंबरे आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्‍वर जवळील कश्यपी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी सचिन ठोंबरे त्यांच्या पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेले केतन व कौशल पवार हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा खोल अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले.

या दुर्घटनेत ठोंबरे दाम्पत्याची अवघ्या दोन वर्षाची चिमुकली पाण्याच्या बाहेर सुरक्षित होती. आई-वडील पाण्यात बुडाल्याने ती एकटीच टाहो फोडून रडत होती. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या संगीता घाडगे या महिलेने त्या लहान मुलीला रडताना पाहिले आणि तत्काळ धाव घेऊन तिला सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांनी स्थानिकांना माहिती दिली, परंतु स्थानिकांनी धाव घेऊन प्रयत्न करेपर्यत खूप उशीर झाला होता आणि चौघांचाही मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपरने येथे जाऊन ठोंबरे कुटुंबीयांची भेट घेतली. मयत सचिन ठोंबरे यांची आई श्रीमती ताराबाई आणि भाऊ योगेश ठोंबरे यांच्यासह शोकाकुल कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच, या पीडित कुटुंबीयांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी, यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ​अंत्यसंस्काराच्या वेळी गावकऱ्यांसह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे पिंपरने गावाला मोठा धक्का बसला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. प्रत्येकाने पर्यटनाच्या ठिकाणी पाण्याजवळ जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याप्रसंगी सुधाकर रोहम, शरद थोरात, अण्णासाहेब राहींज, दादासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, बाबासाहेब राहींज, दिनकर वाकचौरे, देवराम वाकचौरे, नंदू ठोंबरे, संजय बागुल, अरुण देशमुख, प्रसाद मांडे, भास्कर ठोंबरे, प्रभाकर ठोंबरे, कृष्णा काळे, संजय ठोंबरे आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !