भोजापूर चारीवर राजकीय भाकरी भाजणारे पाणी प्रश्नावर गप्प का? - बाळासाहेब थोरात
◻️ तळेगाव दिघे येथील ऊस विकास मेळाव्यात मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | “चिंचोली गुरव येथील ऐतिहासिक पाणी परिषदेच्या माध्यमातून निळवंडे धरणाचा लढा उभा केला. अनेक अडथळे पार करून धरण आणि दोन्ही कालवे पूर्ण केले. आता धरण भरले आहे, मात्र संगमनेर तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यत आग्रही आहोत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील पाणी प्रश्न आणि रखडलेल्या विकासाकामांवरून सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ज्यांनी धरण उभारणीत अडचणी निर्माण केल्या, तेच आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ८१ कोटींचा निधी आम्ही मंजूर केला होता. गेल्या दीड वर्षात हे काम सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यामुळे बंद होते. आम्ही संवाद साधून हे काम मार्गी लावले आणि आज प्रत्येक गावात पाणी पोहोचले आहे. ज्यांचे काहीही योगदान नाही, त्यांनी श्रेय घेण्यापेक्षा नवी कामे करून दाखवावीत,” अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता टोला लगावला.
तालुक्यातील निमोण, नान्नज दुमाला, पारेगावसह विविध गावांसाठी मंजूर केलेल्या उपसा सिंचन योजना सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्याचा आरोप थोरात यांनी केला. तसेच, भोजापूर चारीच्या विषयावर राजकीय भाकरी भाजणारे आता पाणी प्रश्नावर गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी जनतेला केला. रेल्वे प्रकल्पाच्या जमिनींसाठी ५६० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले होते, मात्र आता जीएमआरटीचे कारण देऊन रेल्वे प्रकल्प पळवण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा सल्ला दिला. “दूध आणि ऊस ही शाश्वत पिके आहेत. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीत नवनवीन प्रयोग करून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे,”. असे आवाहन त्यांनी केले. चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत बोलताना, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या मेळाव्यात डॉ. अशोक जगताप आणि डॉ. समाधान सुरवसे यांनीही मार्गदर्शन केले. माती परीक्षण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.