अखेर.. राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश
◻️ डॉ. सुजय विखे पाटलांच्या ‘डबल मास्टरस्ट्रोक’ने समीकरणे बदलली!
संगमनेर LIVE (मुंबई) | अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबई येथील पक्षकार्यालयात संपन्न झाला. या घडामोडीमुळे शरद पवार गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना विजयी करण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघांत ११ पेक्षा जास्त सभा घेऊन त्यांनी पक्ष संघटना बळकट केली होती. विशेष म्हणजे, पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी सहा महिने आधीपासूनच डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवादाचे पूल बांधले होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय, हा याच राजकीय रणनीतीचा एक भाग होता. आज त्यांच्या भाजप प्रवेशासह या रणनीतीचा ‘फायनल टप्पा' यशस्वी झाला आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे अक्षय कर्डीले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा एक प्रभावी चेहरा पक्षात आणणे, या दुहेरी खेळीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक प्रबळ झाली आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आता डॉ. सुजय विखे पाटील हेच या सर्व घडामोडींचे ‘मास्टरमाइंड' असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगरच्या आगामी राजकारणात भाजपची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट दिसत असून, शरद पवार गटासाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.