‘दोन दादां’चे आलिंगन अन् राजकारणात ‘विखे-तनपुरे’ युतीवर शिक्कामोर्तब!
◻️ आजोबा - नातवाच्या इतिहासाला मिळाला उजाळा
संगमनेर LIVE (मुंबई) | शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
एकेकाळी लोकसभेच्या मैदानात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे हे दोन दिग्गज नेते आता एकाच पक्षात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी सुजय विखे पाटील यांचा सत्कार करताना, "आजोबानंतर आता नातूही एकत्र आले," अशी टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर तनपुरे आणि विखे यांनी एकमेकांना मिठी मारली, तेव्हा कार्यकर्त्यानी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या युतीचे स्वागत केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे पक्षात स्वागत करताना त्यांच्या कामाचे कौतुक केले. “तनपुरे हे अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच मोठी बळकटी मिळेल,” असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत विखे आणि तनपुरे एकमेकांच्या विरोधात होते, मात्र आता ही ‘नवी युती' राहुरीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यानी व्यक्त केली. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळेच तनपुरे यांचा हा प्रवेश शक्य झाला, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडींनंतर आगामी काळात राहुरीच्या राजकारणात मोठी समीकरणे बदलणार, हे निश्चित मानले जात आहे.