डॉ. हसमुख जैन यांना प्रतिष्ठेचा ‘ब्रेकथ्रू रिसर्च इव्हॉन’ पुरस्कार!
◻️ सामान्य रुग्णांसाठी कर्करोग (कॅन्सर) उपचार होणार सुलभ
संगमनेर LIVE | मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे ज्येष्ठ कॅन्सरतज्ञ डॉ. हसमुख जैन यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल शिकागो येथील पार्क वेस्टमध्ये आयोजित सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ब्रेकथ्रू रिसर्च इव्हॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर स्वस्त आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
डॉ. जैन यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी ‘सीएआर-टी’ सेल थेरपी म्हणजेच ‘नेक्सकार-१९'च्या विकासाचे नेतृत्व केले आहे. ही उपचारपद्धती बी-सेल कर्करोगाच्या अशा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे, ज्यांना पारंपरिक उपचारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. आयआयटी बॉम्बे आणि अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित केलेली ही थेरपी क्लिनिकल चाचणी सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ महिन्यांत नियामक मान्यतेपर्यंत पोहोचली, हा एक जागतिक विक्रम मानला जातो.
केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता, डॉ. जैन यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागांत कर्करोग उपचार सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण रुग्णालयांत ऑन्कोलॉजी विभाग, बहुविद्याशाखीय ट्युमर बोर्ड आणि बोन मॅरो प्रत्यारोपण सुविधांची उभारणी झाली असून, सामान्यातील सामान्य रुग्णाला अत्याधुनिक उपचार परवडणाऱ्या दरात मिळावेत हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डॉ. जैन यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अत्यंत व्यापक आहे. त्यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ८५ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित केले असून, सध्या ते १५ महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांचे प्रमुख संशोधक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सेल थेरपी विभाग उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील या विभागातून आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच, नॅशनल कॅन्सर ग्रिडच्या रक्तविकारांवरील कर्करोग उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे समन्वयक म्हणूनही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
“केवळ नवीन उपचार शोधणे पुरेसे नसून, ते रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे महत्त्वाचे आहे,” अशी ठाम भूमिका मांडणाऱ्या डॉ. जैन यांनी देश-विदेशातील वैद्यकीय विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केले आहेत. त्यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाचाच नव्हे, तर त्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या निस्वार्थी कार्याचा गौरव आहे.
दरम्यान, डॉ. जैन यांच्या या जागतिक यशाबद्दल कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.