समनापूरकराचा ४० वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी; गावाला दररोज पाणीपुरवठा होणार!
◻️ पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या पुढाकाराने पाणीपुरवठा सुरळीत
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील समनापूर आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा २४ तास सुरू झाल्याने गावाला आता दररोज नियमित पाणी मिळणार आहे.
समनापूरसह वाड्या-वस्त्यांवर आठ दिवसांपासून पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनेला केवळ सहा तास वीज मिळत होती, परिणामी सात-आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. ही गंभीर समस्या शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रणजित जाधव यांनी संगमनेर येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ आणि भाजप सरचिटणीस संपत गेठे यांच्यासमोर मांडली होती.
तात्काळ दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे तातडीने निर्देश दिले. यानंतर निंबाळे शिवारातून जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा २४ तास अखंडित राहावा, यासाठी महावितरणने युध्दपातळीवर काम करत अवघ्या काही दिवसांत ही समस्या निकाली काढली.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गावातील म्हतू शरमाळे, भाऊसाहेब शेरमाळे, रामनाथ केसकर, राजेंद्र गायकवाड, रणजित जाधव, संपत गेठे, सुनिल चांडे, राहुल पकळे, एकनाथ शेरमाळे, संदीप शेरमाळे, राजेश शेरमाळे, मेजर रावसाहेब शेरमाळे, भागा शेरमाळे, मनोज भास्कर, मच्छिंद्र शेरमाळे, बापू दळवी, देवेंद्र साळवे आणि ग्रामस्थांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करून घेतले. या तत्परतेमुळे भर उन्हाळ्यात समनापूरला दिलासा मिळाला असून, ४० वर्षापासूनचा हा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेसाठी आता २४ तास वीज उपलब्ध झाल्यामुळे गावातील वाडी-वस्त्यांवर पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेबाबत आभार मानले आहेत.