विद्यार्थ्यानी स्वतःची क्षमता ओळखून आत्मविश्वसाने पुढे जावे - मंत्री विखे पाटील
◻️ प्रवरा शिक्षण संस्थेच्या दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
संगमनेर LIVE (लोणी) | शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या असलेली वाढती स्पर्धा, पालकांच्या मोठ्या अपेक्षा आणि विविध शिक्षण पध्दतींचा विद्यार्थ्यावर पडणारा ताण ही चिंतेची बाब आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यानी स्वतःची खरी क्षमता ओळखून आत्मविश्वसाने भविष्याच्या दिशेने वाटचाल करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सौ. शालिनीताई विखे, डॉ. भास्करराव खर्डे, विनायक देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षण पोहोचवण्याचे कार्य प्रवरा संस्था सक्षमपणे करत आहे. मात्र, सध्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या विविध ‘पॅटर्न'मुळे शिक्षणाचा खर्च वाढला असून विद्यार्थ्यावर मानसिक दबाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्याच्या मनातील भावना समजून घेऊन त्यांना योग्य दिशा दाखवणे आवश्यक आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण पाहता, आगामी काळात युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी ‘रतन टाटा इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
१९६४ मध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा मजबूत पाया रचला. आज प्रवरेचे विद्यार्थी जागतिक स्तरावर यश संपादन करत असल्याचा अभिमान व्यक्त करताना विखे पाटील यांनी शिक्षणातील व्यापारीकरणा बद्दल खंत व्यक्त केली. खाजगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या बाजारपेठेपेक्षा शाळा-महाविद्यालयां मध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी याप्रसंगी सूचित केले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी प्रवरेच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेताना सांगितले की, “केवळ नोकरी शोधणारा नव्हे, तर नोकरी देणारा विद्यार्थी घडवणे” हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी संस्कारक्षम शिक्षण आणि कौशल्याधारित उपक्रमांवर संस्थेचा विशेष भर आहे. पालकांना संवादासाठी ‘सीईओ हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या सत्कार सोहळ्यात दहावी-बारावीच्या यशात झळकलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. लीलावती सरोदे यांनी केले.