संगमनेर तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
◻️ दगडसोंडवाडीसह हिवरगाव पठार पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील दगडसोंडवाडी येथे बुधवारी (दि. २७) दुपारी अंगावर वीज कोसळल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मच्छिंद्र झुंबर दुधवडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र दुधवडे हा तरुण खंडेरायवाडी येथे शेतीची कामे आटोपून बुधवारी दुपारी दगडसोंडवाडी आपल्या गावी परतत होता. याचं दरम्यान परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. आपली दुचाकी गाळात अडकू नये म्हणून ती रस्त्याबाहेर काढण्याचा प्रयत्न मच्छिंद्र करत असतानाच, दुर्दैवाने त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. मच्छिंद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अत्यंत कष्टकरी आणि होतकरू तरुण गमावल्यामुळे दगडसोंडवाडी आणि हिवरगाव पठार परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.