शिर्डीत ​रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचे शनिवार आणि रविवारी विशेष प्रदर्शन

संगमनेर Live
0

शिर्डीत ​रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचे शनिवार आणि रविवारी विशेष प्रदर्शन

◻️ विद्यार्थी आणि नागरिकांसाठी संरक्षण साहित्य पाहण्याची संधी

संगमनेर LIVE (​शिर्डी) | अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उध्दघाटन शनिवार, दिनांक २३ मे रोजी होणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

​केवळ एका वर्षाच्या विक्रमी कालावधीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता पाच लाख तोफगोळे इतकी असून, याचे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशातील एक प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाईल.

​प्रकल्पाच्या उध्दघाटन सोहळ्यानिमित्त शनिवार, २३ मे आणि रविवार, २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्रे हे विशेष आकर्षण ठरणार असून, देशातील प्रमुख संरक्षण कंपन्यांसह शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाद्वारे रॉकेट लाॅचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधांची माहिती नागरिकांना घेता येणार आहे.

​साधारण दोनशे एकर क्षेत्रावर पसरलेल्या या संरक्षण प्रकल्पात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विज्ञानप्रेमी नागरिक, महिला आणि तरुणांना संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान जवळून पाहण्याची ही एक मोठी संधी आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला आधीच रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के. के. रेंजेस आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. 

दरम्यान, या नवीन प्रकल्पामुळे जिल्ह्याची संरक्षण क्षेत्रातील ओळख अधिक बळकट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यानी या ऐतिहासिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !