युध्दाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका मोठा - उध्दव महाराज

संगमनेर Live
0

युध्दाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका मोठा - उध्दव महाराज 

◻️ ​महंत उध्दव महाराज मंडलिक यांचा शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार

संगमनेर LIVE (नेवासे) | नेवासे तालुक्यातील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम (सुरेगाव रोड) येथील मठाधीपती महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने परखड भूमिका घेतल्याबद्दल, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.

​सत्काराला उत्तर देताना उध्दव महाराज यांनी अत्यंत मार्मिक आणि काळजाला भिडणारे विचार मांडले. ते म्हणाले की, “आज ६० एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुली लग्नासाठी मिळत नाहीत, मात्र छोट्याशा नोकरीवर असलेल्या तरुणाला पसंती दिली जाते. यामुळे गावे ओस पडू लागली आहेत. शेतकरी हा मूळचा राजा आहे, परंतु त्याची ही पत घालवण्याचे काम आजी-माजी राज्यकर्त्यानी केले आहे.”

​राजकारणावर भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांचे कान टोचले. “शेतकरी निवडणुकीत कोण हरले आणि कोण जिंकले याची चर्चा रंगवतात, पण स्वतःची जी आर्थिक पडझड झाली आहे, त्यावर चर्चा करत नाहीत. ज्या दिवशी वारकरी आणि शेतकरी एकत्र येतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने शेतकरी चळवळ मोठी होईल,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “जगाला युद्धाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका अधिक मोठा आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

​अ‍ॅड. अजित काळे यांनी महाराजांच्या कार्याचे गौरवोग्गार काढले. ते म्हणाले की, कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार सांगतानाच समाजातील ज्वलंत प्रश्नांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर परखडपणे बोलणारे उध्दव महाराज हे महाराष्ट्रातील पहिले महंत आहेत. त्यांच्या या संघर्षाची दखल शासन दरबारी नक्कीच घेतली जाईल.
​शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रा. कार्लस साठे यांनीही आपले विचार मांडले. शिक्षक आणि कीर्तनकार यांसारख्या समाजधुरीणांनी जर शेतीचे प्रश्न मांडले, तर समाजाचे प्रबोधन होण्यास वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, ​या सोहळ्यात हरिअप्पा तूवर, मेजर अशोक काळे, साहेबराव चोरमल, पंढरी महाराज आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे शिक्षक महेश गवळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार महेश शिंदे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !